यवतमाळ - लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी काम करणारे कर्मचारीच मतदानापासून वंचित राहिले आहेत. मतदान प्रक्रियेत कर्तव्यावर असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना टपाल मतपत्रिका मिळाली नाही. त्यामुळे त्यांना मतदान करणे शक्य झाले नाही.
कर्मचाऱ्यांना पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्याची निवडणूक विभागाने माहिती दिली. मात्र, या मतपत्रिका मिळाल्या नसल्याच्या अनेक तक्रारी आज पुढे आल्या आहेत.
टपाल मतपत्रिकेचे मतदान यवतमाळ तहसिल कार्यालयात स्विकारण्यात आले. मात्र मतपत्रिका मिळणे आणि मतदारांचे यादीत नाव नसल्याने मोठ्या प्रमाणात सावळा-गोंधळ झाला आहे.
काही मतदारांना दोन मतपत्रिका मिळाल्या आहेत. तर अनेकांना मतपत्रिकेसाठी तहसिल कार्यालय आणि पोस्टाच्या चकरा माराव्या लागल्या आहेत. मात्र कुठेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
यवतमाळ विधानसभा काँग्रेसचे प्रतिनिधी अनिल गायकवाड म्हणाले, शेकडो पोस्टल मतपत्रिका पडून आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
ऋषभ डबले हे होमगार्ड म्हणून मतदान केंद्रावर कर्तव्य बजावित होते. मात्र त्यांना पोस्टामध्ये चकरा मारूनही मतपत्रिका मिळाली नाही. मतदान प्रक्रियेत कर्तव्य बजाविणाऱ्या शैलेश चौधरी यांनी घरी मतपत्रिका आली नसल्याचे सांगितले. उलट पोस्टातील कर्मचाऱ्यांनी हेलपाटे मारावे लावल्याचे त्यांनी म्हटले आहे.