यवतमाळ : माता, मातृभाषा आणि मातृभूमी या तिन्हीबद्दल प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी आवश्यक जाणिवा संवर्धित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. ते एक इंग्रजी माध्यम शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, आपल्या मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासताना तिच्याबाबतच्या जाणिवा वृद्धिंगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या मूळ सांस्कृतिक परंपरांविषयी आपण आग्रही असले पाहिजे. या परंपरांशी असलेली बांधिलकी प्रत्येकाने कायम ठेवावी. आपल्या संस्कृतीत अनेक उदात्त परंपरा आहेत. या परंपरांचे पालन करताना पूर्वजांचे कृतज्ञ स्मरण ठेवले तरच समाज व देशाचे सांस्कृतिक उत्थान होऊ शकेल, असे त्यांनी यावेळी आग्रहाने सांगितले.
आर्थिक महासत्ता होण्याचे आव्हान
भारत ही जागतिक महासत्ता होण्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. भारत हा जगद्गुरु झाला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी सर्वांनी कटिबद्ध होऊन प्रयत्न करताना, देशात विषमता समाप्त होऊन समता स्थापित करण्यासाठीही आपण झटले पाहिजे. हीच स्वातंत्र्यसैनिक आणि शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गोवर्धन लाल पाराशर, संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा, संस्थेचे सदस्य व माजी मंत्री राजेंद्र दर्डा, सचिव किर्ती गांधी, शाळेच्या प्राचार्य मिनी थॉमस आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - Nawab Malik Tweet : 'धन्य है दाऊद ज्ञानदेव...' मलिक यांच्याकडून आणखी एक खुलासा