यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथे झालेल्या सभेमध्ये पाणी न मिळाल्याने एका बालिकेचा मृत्यू झाला. क्षितिजा गुटेवार (वय १४) असे त्या बालिकेचा नाव आहे. दरम्यान, मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था न केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप क्षितीजाच्या नातेवाईकांनी केला आहे.
पांढरकवडा येथे शनिवार १६ फेब्रुवारी रोजी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. मेळाव्यासाठी शिवाजी वार्डातील काही महिला सकाळी ८ वाजताच ऑटोरिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितीजा, तिची आई सुनीता आणि ७ वर्षाचा भाऊ कृष्णासुद्धा गेला होता.
सभा स्थळावरून पाणी पिण्यासाठी जाण्यासही मज्जाव-
या मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यातच सकाळी ११ वाजताची सभा असल्याने उनाचा पाराही वाढला होता. मेळाव्याच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने कित्येक महिलांचा जीव कासावीस झाला होता. घसा कोरडा पडत असताना सभास्थळी कोणत्याच ठिकाणी पाणी आढळून आले नाही. त्यातच गर्दी असल्याने तेथे अडकलेल्या महिलांना बाहेर निघणेही कठीण झाले होते. कुणी निघण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पोलिसांकडून आडकाठी आणली जात होती.
सुरक्षेच्या कारणावरून महिलांना जागीच बसून राहण्याचे फर्मान पोलीस अधिकाऱ्यांकडून सोडले जात होते. तसेच त्याठिकाणी पाणी नेण्यासाठीही मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पाणी न मिळाल्याने उपस्थित महिलांना ५ ते ७ तास पाण्याविना राहावे लागले. या सभेत पाणी न मिळाल्यानेच मुलीची प्रकृती खालावली होती. तिला सुरवातीला पांढरकवडा आणि नंतर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे क्षितीजाच्या नातेवाईंकाकडून सांगण्यात येत आहे.