यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथील आयशोलेसन वॉर्डात आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्यावर यवतमाळ येथील स्मशानभूमीत नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाबाधित असलेल्या पतीलाही अंत्यदर्शन घेता आले नाही.
यवतमाळ जिल्ह्यात 125 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. 99 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहे. मात्र, कोरोनाबाधित महिलेचा पहिला बळी जिल्ह्यात गेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्या महिलेला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश आले नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह नागापूर या गावी नेता आला नाही. पतीने यवतमाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात यावे असे मेडिकल प्रशासनाला लिहून दिले.
वॉर्डातील चार कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका चालक पूर्ण काळजी घेत मृतदेह पांढरकवडा मार्गावरील स्मशानभूमीत घेऊन गेले. तिथेच त्यांनी अंत्यसंस्कार केले. मृत्यूनंतर नातेवाईकाचा अखेरचा चेहरा बघता यावा, यासाठी हजारो किलोमीटर अंतरावरून लोक येतात. कोरोनामुळे मृताला आपल्या जन्मगावी जागा मिळत नाही. अनोळखी असलेले कर्मचारी नातेवाईकाची भूमिका पार पाडताना दिसतात.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा, आरोग्य अधिकारी डॉ. विजय अग्रवाल, अभियंता महेश जोशी, आरोग्य निरीक्षक राहूल पळसकर, विभाग प्रमुख प्रफुल जनबंधू, अमोल पाटील आदींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडला.