यवतमाळ - नांदेड ते नागपूरसाठी निघालेली एसटी बस उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागाव जवळील नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. ही घटना मंगळवारी घडली. यात चालक आणि वाहक यांच्यासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. बेपत्ता असलेला एक मृतदेह नाल्यापासून दीड किमी अंतरावर आढळून आला आहे. हा मृतदेह बस चालकाचा असल्याची महिती पुढे आली आहे. मंगळवारी सुरू असलेला पाऊस आणि अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले होते. आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू केली होती.
गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू -
जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागाव येथील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच 14 बीटी 5018) पाण्यात वाहून गेली. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवासी याना गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या बसमध्ये 4 प्रवाशी आणि चालक व वाहक असे 6 प्रवासी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस नांदेडवरून नागपुरला पुसदमार्गे जात होती.
यात आज सकाळी चालक सतीश रंगप्पा सुरेवार(54) यांचा मृतदेह सापडला आहे. काल रात्री उशिरापर्यंत वाहक भीमराव लक्ष्मण नागरिकर (52), इंदल रामप्रसाद महिंद्रे (35) शेख सलीम शेख इब्राहीम (50, रा. पुसद) या तिघांचे मृतदेह सापडले होते.
हेही वाचा - बसमधील मृतकांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत देणार - खासदार हेमंत पाटलांची माहिती