यवतमाळ - पिंपळगाव परिसरातील रोहिलेबाबा झोपडपट्टी वस्तीत तीन सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत 4 घरे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून आग विझविण्यासाठी नगरपालिकेच्या तीन बंबाच्या सहायाने आग आटोक्यात आणली आहे.
सिलिंडर लिक झाल्याने झाला स्फोट -
एका घरात चूल पेटविल्यानंतर सिलिंडर लीक असल्याने आगीचा भडका उडाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. दाटीवाटीच्या या वस्तीतील चार घरे आगीच्या भक्षस्थानी आली. या आगीत योगेश ठाकरे, संध्या पराते, लता कवडे, अरुणा धुर्वे यांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली.
प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी -
रोजमजुरी करणाऱ्यांची ही वस्ती असून आगीमुळे चार कुटुंब उघड्यावर आली आहे. त्यांच्या घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे, पैसे हे आगीत खाक झाले. तर एका मुलीचा हात आगीत भाजल्या गेला. दरम्यान आगीची सूचना मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
हेही वाचा - चित्तूर मुलींची हत्या प्रकरण : मुलीला मारल्यानंतर आईने तिची जीभ खाल्ली