यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावलेश्वर इथे अचानक आग लागली. या आगीत गावातील 4 घरे जाळून खाक झाली. या आगीत घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावालगतच्या शिवारात सकाळपासून श्रमदान सुरू होते. त्यावेळी गावातील एका घराशेजारी असलेल्या जनावरांच्या चाऱ्याच्या गंजीला आग लागली. हळूहळू या आगीने रौद्ररूप धारण करत ४ घरांना आपल्या कवेत घेतले. या आगीत घरातील भांडी आणि इतर सामान जाळून खाक झाले. ही आग लागली असताना श्रमदान करणाऱ्या काही लोकांचे लक्ष या घटनेकडे गेले. त्यामुळे सर्व लोकांनी गावकडे धाव घेतली. उमरखेडहून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळाने आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत घरातील संपूर्ण समान जळून खाक झाल्याने हे परिवार उघड्यावर आले.