यवतमाळ - देशात बर्ड फ्लूने एन्ट्री केली आहे. राज्यात रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नसला तरी काळजी घेतली जात आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर वनविभागाला सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावी, काय उपाय योजना कराव्यात याचे निर्देश वनविभागाला देण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
वनविभागाला सतर्क राहाण्याचे आदेश
कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच पुन्हा बर्ड फ्लूचे संकट घोंघावत आहे. राज्यात मोठया प्रमाणात विदेशी पक्षी स्थलांतर करून येतात. पक्षी मृत आढळून आल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्यात यावी. हॅन्ड ग्लोव्हज घातल्याशिवाय मृत पक्ष्यांना हात लावू नये, असे परिपत्रक काढण्याच्या सूचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश राज्यात मृत पक्षी आढळून आल्याने, त्या पार्श्वभूमीवर वनविभाग सतर्क झाल्याचे राठोड यांनी सांगिलते.