यवतमाळ - फ्लेमिंगो पक्षी भारतात सहसा आढळत नाही. पण यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा धरणावर फ्लेमिंगों पक्षी मुक्कामी आले आहे. विशेष म्हणजे, या पक्ष्यांमुळे स्थानिकांना चांगला रोजगारही मिळत आहे. पांढरकवडा येथील मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी फ्लेमिंगो कॅमेराबद्ध करून त्यांची नोंद घेतली आहे. जिल्ह्यातच नव्हेतर महाराष्ट्रात कुठेही फ्लेमिंगो येणे दुर्मिळ आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी हे स्थलांतरित पक्षी दिसले तरी ते फार तर एक-दोन दिवस थांबतात. मात्र, सायखेडा धरण परिसरात ते दरवर्षी एप्रिलच्या सुमारास येऊन काही दिवस मुक्काम करत असल्याची माहिती डॉ. विराणी यांनी दिली. २०१५ मध्ये या परिसरात १३ तर २०१६ मध्ये ३२ फ्लेमिंगोंची नोंद विराणी यांनी घेतली होती. मध्यंतरीच्या काळात हे पक्षी आले नाही. तर आता यावर्षीच्या एप्रिलमध्ये मात्र ५१ इतक्या विक्रमी संख्येत येऊन फ्लेमिंगोंनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या फ्लेमिंगोची स्थानिक रहिवासीही व्यवस्थित काळजी घेतात. शिवाय, धरण परिसरात गुरे चारणारे, मासेमारी करणारे यांच्याकडून या पक्ष्यांना त्रास होऊ नये, याकरिता पांढरकवडा वनविभागातर्फे दोन कर्मचारी पाळत ठेवतात.
सायखेडा धरणावर दरवर्षी येणाऱ्या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. २०१६ मध्ये आलेल्या ३२ फ्लेमिंगोमुळे ३० हजारांची मिळकत झाली होती. मासेमार आपल्या बोटीतून ३०० रुपयांच्या मोबदल्यात पर्यटकांना धरणात घेऊन जातात. एका वेळी दोघांनाच नेले जाते. ३०० फूट अंतरावरून पर्यटक फ्लेमिंगो बघू शकतात, त्यांचे छायाचित्र घेऊ शकतात. मात्र यावर्षी हे पक्षी केवळ दोन ते तीन दिसस या धरणावर मुक्काम केल्याचे डॉ. विराणी यांनी सांगितले.