यवतमाळ - फुलसावंगी येथील मुन्ना या प्रयोगशील तरुणाचे हेलिकॉप्टर चाचणी घेताना 10 ऑगस्टला अपघाती निधन झाले. त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार निलय नाईक आणि आमदार नामदेव ससाणे यांनी भेट दिली. त्यांनी मुन्नाच्या कुटुंबाला तातडीने पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली.
शेख इस्माईल शेख इब्राहिम उर्फ मुन्ना हा 'मुन्ना हेलिकॉप्टर' या टोपण नावाने ओळखले जाणाऱ्या प्रयोगशील तरुणाने हेलिकॉप्टरची निर्मिती केली होती. हा प्रयोग यशस्वी करून ते हेलिकॉप्टर एअर अॅब्युलन्स किंवा शेतीसाठी फवारणी यंत्र म्हणून वापरण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, दुर्दैवाने हेलिकॉप्टरची चाचणी घेताना त्याचे अपघाती निधन झाले. या अपघाताने केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाल्याच्या भावना नितीन भुतडा यांनी व्यक्त केल्या.
इस्माईलचे केवळ आठवीपर्यंत शिक्षण
इस्माईल हा पत्रा कारागिर होता. त्याचा मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अलमारी, कुलर अशी विविध उपकरणे बनवून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवित होता. हे करत असतानाच हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्नही तो पाहत होता.
स्वप्न अर्धवटच...
अखेर दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्याने हेलिकॉप्टरचे काम जवळपास पूर्ण केले होते. या हेलिकॉप्टरची चाचणी घेण्यासाठी मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी रात्री तयारी केली. ट्रायल सुरू केल्यानंतर हेलिकॉप्टरचे इंजिन 750 अम्पिअरवर फिरत होते. सर्व व्यवस्थित सुरू होते. पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि वरील मुख्य फॅनला येऊन धडकला. हा फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे स्वप्न होते की एक दिवस गावाचे नाव जगाच्या पटलावर आणायचे. मात्र, इस्माईलचे स्वप्न अर्धवटच राहिले. दरम्यान, त्याच्या निधनावर परिसरातून शोक व्यक्त होत आहे. शेख इस्माईलच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते मुन्नाच्या कुटुंबाला भेट देत आहेत.
हेही वाचा - यवतमाळ : अंजी नाईक येथे जेवणातून 45 जणांना विषबाधा
हेही वाचा - शेतकऱ्यावर यंदाही गुलाबी बोंड अळीचे संकट, पिकं बहरली तसा रोगही बहरला; 'ईटीव्ही भारत'कडून आढावा