यवतमाळ - सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना व प्रोत्साहन देणारे शिक्षण मिळावे. विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन मिळावे. यासाठी परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील पहिली 'ई-स्टीम' अविष्कार प्रयोगशाळा यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये सुरु करण्यात आली आहे.
भारतीय शिक्षण परिक्षा केंद्रित झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच नवनिर्मिती करण्याची संधी अविष्कार लॅब मधून मिळणार आहे. अर्थव्यवस्था ग्रामीण भागाकडे वळत आहे. त्यामुळे भविष्यात कृषी आधारित नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संध्या उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कल्पकता वापरून नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न करावा. संशोधनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, पर्यावरण, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणित अर्थात ई स्टीम या संकल्पनेवर आधारित या अविष्कार लॅबमधून विद्यार्थ्यांना कृषी व विज्ञानाचे नाविन्यपूर्ण प्रयोग करता येणार आहे.
या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व त्यांच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या आधुनिक प्रयोगशाळेत संशोधनासाठी आवश्यक विविध साहित्य, उपकरणे बसविण्यात आली आहे. शिक्षण विभागाने सरकारी शाळांमध्ये अशा लॅब सुरु करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे आवाहनही जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.