यवतमाळ- जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतीच्या आजूबाजूला जंगल लागून आहे. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जाते. मात्र शेतकऱ्यांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्याने फटाका बंदूक शोधून काढली आहे. अल्प खर्चात ही बंदूक बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांची याला पसंती मिळत आहे.
खरिप हंगामावर शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. पेरणीपासून ते पीक घरात येईपर्यंत शेतकऱ्यांना डोळ्यात तेल ओतून पिकांची सुरक्षा करावे लागते. मात्र, वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्यासाठी घातक ठरतात. तसेच रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकांमध्ये रानडुक्कर, रोही, माकड हे प्राणी पिकांचे मोठे नुकसान करताता. त्यांना पळवून लावण्यासाठी ही बंदूक शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे.
त्यामुळे शेतकरी आपले पीक वाचवण्यासाठी फटाक्यांच्या आवाज करणारे बंदूक खरेदी करीत आहे. ग्रामीण भागात या बंदूकीला मोठ्या प्रमाणात पसंती आहे. या बंदूकीच्या आवाजाने वन्यप्राणी पळून जातात आणि पुन्हा भीतीने आठ दिवस फिरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. ही फटाका बंदूक तयार करण्यासाठी जवळपास दीडशे रुपयांपर्यंत खर्च येते. तयार करण्यासाठी एक तीन फूट पाईप, लाइटर, रेड्यूसर आणि मागे लावण्यासाठी एक कॅप असा दीडशे रुपये खर्च येतो. या बंदुकीमध्ये एक लहान कार्बोरेटचा लहान तुकडा टाकून त्यावर दोन थेंब पाणी टाकल्या जाते. त्यात गॅस तयार होताच पाठीमागील लाईटर दाबताच बंदुकीच्या गोळी सारखा आवाज होऊन वन्य प्राणी पळून जातात. अल्प खर्चात वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण या बंदुकीमुळे होत असल्याने याला शेतकरी पसंती देत आहेत.