यवतमाळ - कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना यापुढे 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. काही नागरिक कोणतीही खबरदारी न घेता बेजबाबदारपणे विनामास्क फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे. याची सक्तपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, काहीजण नियमांचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक स्थळी मास्क न वापरल्यास प्रथम दंडात्मक व त्यानंतर फौजदारी कारवाई होणार आहे. संबंधित कारवाई स्थानिक नगर पालिका, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन करणार आहे.
सार्वजनिक स्थळी मास्कचा वापर न केल्यास पहिल्यांदा 500 रुपये दंड, दुस-यांदा व तिस-यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-या व्यक्तिविरोधात साथरोग प्रतिबंधित कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय दंड संहितेचे कलम 188 व इतर कायदे आणि नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, नुकतेच मुंबई मनपाने एक हजारांवरील दंडाची किंमत कमी केली आहे. मनपाच्या नव्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.