यवतमाळ - लोणीतील शेतकऱ्यांना कापूस पिकावरील बोंड अळीमुळे नुकसानाचा सामना करावा लागत आहे. बोगस बियाणांनंतर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातील सोयाबीन पीक गेले. आता शेतातील कपाशी बोंडात कापसाऐवजी बोंडअळी निघत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. बोंडअळीच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे लोणीतील सोळंखे भावंडांनी 11 एकरतील उभ्या कपाशीच्या पिकात गुरे सोडली आहेत.
शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार
जिल्ह्यात यावर्षी पावणेपाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली गेली आहे. यात 70 टक्के शेतकऱ्यांच्या कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले आहे. कृषी विभागात तक्रारी देऊनही कुठलीच दखल घेतली जात नसल्याचे दिसून आल्याने शासन दरबारी नुकसानग्रस्त शेतकर्यांना न्याय कधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कपाशी पिकात गुरे सोडली
यवतमाळ जिल्ह्यातील लोणी येथील शेतकरी अमोल सोळंके, नितीन सोळंके, नीलेश सोळंके हया तिघा भावांची 14 एकर शेती आहे. यात अडीच एकरावर सोयाबीन तर 11 एकरात कपाशी या पिकांची लागवड केली होती. बोगस बियाणेनंतर परतीच्या पावसानी अडीच एकरातील सोयाबीनचे कवडीचही उत्पादन झाले नाही. कपाशीचे चांगले उत्पादन होईल या आशेत असणार्या शेतकर्यांच्या पिकातील बोंडात कापसाऐवजी बोंडअळी निघत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या सोळंके शेतकरी बांधवानी 11 एकरातील उभ्या कपाशी पिकांत गावातील जनावरेच सोडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.