यवतमाळ- कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा माल विक्री न झाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे खरीप हंगामासाठी शासनाने शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बियाणे खते देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ही मागणी मान्य झाली तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. अन्यथा शेती पडीक राहण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतातून माल काढून घरी आणला. मात्र, अजूनही जिल्ह्यातील 50 टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मालाची विक्री करता आला नाही. ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. तरी देखील मेसेज न आल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
खरीप हंगामाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. कापूस, गहू, सोयाबीन, हरभरा, तूर घरातच विक्रीविना पडून आहे. ऑनलाइनच्या नावाखाली गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पीक कर्ज मिळाले नाही.
अनुदानावर बियाणे आणि खत न मिळाल्यास 70 टक्के शेती पडीत राहण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. या हंगामात शेतमालाला भाव मिळू शकला नाही. तरी सर्व संकटावर मात करून शेती करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. मशागत आटोपली आहे. आता पेरणीसाठी सरकारने शंभर टक्के अनुदानावर खते, बियाणे देण्यात यावे, अशी मागणी अनुप चव्हाण, मनीष जाधव, राम ढोबळे या शेतकऱ्यांनी केली आहे.