यवतमाळ - लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने उत्पादक शेतकऱ्याचे कंबरडं मोडलं आहे. उत्पादन खर्च तर नाहीच, मात्र मजुरीही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
दिग्रस तालुक्यातील पेळू गावात पाच एकर शेती असलेले अल्पभूधारक शेतकरी अरूण दुधे दरवर्षी भाजीपाल्याचे पीक घेतात. टोमॅटो,पत्तागोबी, फुलगोबी, कोथिंबीर, पालक, मेथी, कांदा व वालाच्या शेंगा अशा विविध भाज्यांपासून त्यांना दरवर्षी जवळपास दोन लाखांचे उत्पन्न मिळते.
मात्र, यावर्षी ऐन हंगामात कोरोनाचे संकट उभे ठाकले. भाजी बाजार बंद झाल्याने भाज्यांचे भाव गडगडले.मात्र, वाहतूक बंद असल्याने लागवड व उत्पादन खर्च तर सोडाच भाजीपाला काढणाऱ्या शेतमजुरांची मजुरी देखील निघत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय.
पिकाला भाव नसल्याने काढणीला आलेल्या टोमॅटोच्या शेतात त्यांनी गुरे चरायलो सोडली. तर पत्ता व फुलगोबीसह इतर पालेभाज्या देखील उपटून फेकायला सुरुवात केलीय.