यवतमाळ - वणी तालुक्यातील इजासन येथील 40 वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा घटना समोर आली आहे. रामचंद्र नामदेव दोरखंडे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.
त्याचा सामना करत शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी केली. मात्र, संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे तालुक्यातील इजासन येथील रामचंद्र नामदेव दोरखंडे या शेतकऱ्याकडे दीड एकर शेती आहे. शेतातील पिकांची स्थिती पाहून त्यांनी शेतात विषारी औषध सेवन केले. घरी आल्यावर त्यांना उलट्या होत असल्याने कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मध्यवर्ती बँकेचे 30 हजारांचे कर्ज असल्याचे त्यांच्या परिवाराने सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली व बहीण असा परिवार आहे.