यवतमाळ - विदर्भातील शेतकऱ्याला नेहमी निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागते. अल्पवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावाने अनेकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. यात व्यवस्थेनेही या शेतकऱ्यांच्या संकटात भरच घातली आहे. वणी तालुक्यातील निळापूर गावातले वासुदेव ठाकरे या शेतकऱ्याला संवेदनहिन व्यवस्थेसमोर अखेर बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय राहिला नाही.
वासुदेव ठाकरे या वृद्ध शेतकऱ्याच्या घराकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्याला शेतातील माल आणि बैलगाडी घराकडे घेऊन जाता येत नाही. हा रस्ता खुला करून देण्यात यावा, यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली. मात्र, या शेतकरी कुटुंबाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे शेवटी या शेतकऱ्याने कुटुंब आणि जनावरासह बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. वासुदेव हे शुक्रवारीपासून वणी तहसील कार्यालयासमोर आपल्या पत्नी आणि बैलासह उपोषणाला बसून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे अनोखे आंदोलन सध्या वणी तालुक्यात चर्चाचा विषय झाला आहे.