यवतमाळ - जुलै महिन्याच्या पंधरावाडा लोटला तरी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यातील जलाशयामध्ये केवळ १९.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने हजेरी न लावल्यांमुळे जिल्हा दुष्काळाच्या कोरड्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.
जिल्ह्यातील काही भागात हा पाऊस बरसला तर काही भागात अपुरा पडला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ १३.९४ टक्के आहे.
अपुऱ्या पावसाने प्रकल्पही भरले नाहीत. जिल्ह्यातील ४ मोठे, ९ मध्यम, १०० च्यावर लघुप्रकल्प तसेच २५० पाझर तलाव कोरडे पडले आहेत. साधारणत जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, यंदा जुलै पंधरवडा उलटूनही पाऊस गायब आहे. यामुळे प्रकल्पातील साठ्यात कुठलीही वाढ झाली नाही. मोठ्या पूस प्रकल्पात सर्वाधिक २१.५८ टक्के पाणी आहे. अरुणावतीमध्ये ९.६४ टक्के जलसाठा आहे. बेंबळा प्रकल्प २८ टक्के भरलेला आहे. इसापूर धरणात अत्यल्प पाणी आहे. ४ मोठ्या प्रकल्पात सरारी २०.३७ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम ९ प्रकल्पात १६.८९ टक्के तर ९४ लघु प्रकल्पात १९.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
खरीपातील अडचणी वाढल्या
जिल्ह्यात केवळ आतापर्यंत १२६ मिमी पाऊस बरसला आहे. आता खरिपाचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. विहिरींची पातळीही वाढली नाही. यामुळे ओलिताच्या शेतीची अवस्था कोरडवाहूसारखी झाली आहे. जिल्ह्यातील ४०२ गावामध्ये अजूनही पाणीटंचाई आहे. यात वणी तालुक्यातील १२ गावे, दारव्हा ४२, पुसद ४३, नेर २५, यवतमाळ २७, बाभूळगाव ९, आर्णी ४५, दिग्रस ५४, महागाव १५, केळापूर ३, झरी ४, घाटंजी ४१, राळेगाव ३, कळंब १६, उमरखेड तालुक्यातील ६३ गावांचा समावेश आहे.