यवतमाळ - डॉ.वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील डीपीला शॉटसर्किटमुळे आग लागली. दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर काहीच काळात अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीच्या भीतीमुळे कोविड सेंटरमधील सर्व संशयित एकाच वेळी वसतिगृहाच्या बाहेर आले. त्यामुळे प्रादुर्भावाचा धोका वाढला.
या भागात असलेल्या डीपी वरूनच महाविद्यालयातील सर्वत्र विजेचा पुरवठा केला जातो. डीपीला आग लागल्यानंतर काही क्षणांत जोरात भडका उडाला. त्यामुळे सर्वच रुग्णांमध्ये भीती पसरली. या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि संशयित असे 100 च्या जवळपास रुग्ण आहे. ते सर्वच धावत रस्त्यावर आले.
सुदैवाने या दुर्दैवी घटनेत कोणालाही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कुणाल झालटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुशार वारे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या ठिकाणची वीज व्यवस्था सुरळीत करण्यात आल्यानंतर सर्व संशयीत व पॉझिटिव्ह रुग्णांना पुन्हा त्या ठिकाणी नेण्यात आले.