यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला बेड मिळत नाहीए. अशा परिस्थितीत खासगी डॉक्टरांकडून प्रचंड लूट सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरने सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या मातेवर मोफत कोरोना उपचार करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. डॉक्टरांच्या या कामाचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.
नगरसेवकाने घेतला पुढाकार-
दारव्हा तालुक्याच्या जांभोरा येथील निखिल बागोकर हा जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात आहे. तर त्याची आई आणि भाऊ जांभोरा येथेच राहतात. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांना हैराण करून सोडलं आहे. जवान निखिलच्या आईला सुद्धा कोरोनाने ग्रासले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांच्यावर उपचारासाठी धावपळ सुरू झाली. ही गोष्ट नातेवाईकांनी निखिलला सांगितली त्याने ताबडतोब यवतमाळ पोलीस अधिक्षक कार्यालयातील कंट्रोलरूमशी संपर्क साधला आणि आईबद्दल माहिती दिली. तेव्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली आणि हालचाली सुरू केल्या. मात्र, कुठेही बेड उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली. तेव्हा निखिलच्या भावाने प्रा. प्रवीण प्रजापती यांच्याशी संपर्क साधला आणि इथूनच खऱ्या अर्थाने सूत्र हलायला सुरुवात झाली. प्रजापती यांनी डॉ. विजय मुन यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सैनिकांच्या आईच्या प्रकृतीची माहिती दिली. डॉ. मुन यांनी कुठलाही विलंब न करता त्यांच्यावर उपचार केले. आज त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे.
ही तर देशसेवीची संधी -
निखिलने आईच्या उपचारा बाबत डॉ . विजय मुन यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला आणि स्वतःची ओळख दिली. पुलवामा येथे सीमेवर सीआरपीएफमध्ये नोकरी करत असल्याचे सांगताच डॉ. मून त्यांच्या पत्नी, शिवाय रुग्णालय संचालक बिपीन चौधरी यांनी या मातेवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. तिच्यावर उपचार करून तिला सुटी सुद्धा देण्यात आली. हे सर्व उपचार डॉ. मून यांनी केले. मात्र उपचाराचा मोबदला म्हणून पैसे घेतले नाही. सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकामुळेच आपण इथे आरामात जीवन जगतो आहे. त्यामुळे त्यांचे उपकार फेडू शकत नाही. या मातेच्या उपचाराने देशसेवेची संधी मिळाली, असे डॉ. अभिमानाने सांगतात. सध्या कोरोनाच्या महामारीत अनेक खासगी डॉक्टर रुग्णांकडून पैसेची लूट केली जात आहे. अशातच डॉ. विजय मूनसारखे काही डॉक्टर रुग्णांना मोफत सेवा देत आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
हेही वाचा - दख्खनेतील महाराष्ट्र..! आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या कार्याची तेलंगाणामध्ये छाप