यवतमाळ - समाजात नात्यांमध्ये दरी निर्माण झाल्याचे चित्र अनेकवेळा पाहायला मिळते. संवेदना बोथट झाल्याचा अनुभव येतो. मात्र, दारव्हा येथील चिमुकल्यांनी मादी श्वान व तिच्या पिल्लांचा जीव वाचवून मानवतेचे दर्शन घडविले.
हेही वाचा - VIDEO: पेंच अभयारण्यात वाघिणीने केली सांबराची शिकार; व्हिडिओ व्हायरल
मालवाहू कटल्यातून मादी श्वानाला रुग्णालयात
दारव्हा येथील अंबिकानगरमध्ये मागील काही दिवसांपासून एक मादी श्वान भटकंती करत होती. परिसरातील लहान मुलांना तिचा लळा लागला होता. काल अचानक चिमुकल्यांना रस्त्याच्या कडेला ती प्रसूती वेदनेने विव्हळताना दिसली. तिच्या किंकाळ्यांनी चिमुकल्यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. त्यांनी ही बाब अंबिकानगरमधील ज्येष्ठांच्या कानावर टाकली. दरम्यान, चिमुकल्यांनी मालवाहू कटल्यात या मादी श्वानाला टाकून पशू वैद्यकीय दवाखान्यात नेले. मरणासन्न अवस्थेतील त्या श्वानावर तातडीने डॉक्टरांच्या चमूने उपचार सुरू केले. परिस्थती पाहून तिचे सिझर करण्याचा निर्णय घेतला. तब्बल दोन तास ऑपरेशन चालले. तिने चार पिल्लांना जन्म दिला. अखेर श्वान व तिच्या पिल्लांना जीवदान मिळाले.
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद
मादी श्वानाची सुखरूप प्रसूती झाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगोले यांनी श्वान व पिल्लांची घराशेजारीच राहण्याची व्यवस्था करून त्यांच्यासाठी दूध व खाण्याची व्यवस्था केली. त्या श्वानास दवाखान्यात भरती करण्यासाठी आदित्य दहीफळकर, निखिल खंडारे, सोहम विलायतकर, शुभम गुल्हाने, वेदांत लाडोळे, रत्नेश इंगोले, विवेक खाडे, देव गायकवाड यांचे योगदान लाभले. तर, पशुधन सहायक आयुक्त डॉ. नेमाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. के. वि. बन्सोड, पशुसेवक सेवादाता विक्की पवार, सुबोध दहिलेकर, चेतन इंगळे यांचा समावेश होता.
हेही वाचा - पश्चिम विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज; १० तारखेनंतर वाढणार थंडी..