यवतमाळ - मागील काही दिवसांपासून यवतमाळ शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सावरगड येथील कचरा डेपोवर गावकऱ्यांनी कचरा टाकण्यास विरोध केला. तर कचरा उचलण्याचे कंत्राट ज्याला देण्यात आले होते तो कामात सतत हलगर्जी करत असल्याने शहरातील प्रभागात कचरा उचलण्याचे काम बंद झाले. शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. यासाठी नगरपालिका व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी धारेवर धरले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत नगरपालिकेला सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या. मात्र, कंत्राटदाराकडून कचरा उचलण्याचे व घंटागाडी चालकांचे वेतन न झाल्याने शहरातील कचरा उचलण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. शहर स्वच्छ व सुंदर राहावे, याकरीता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घनकचरा व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली.
या बैठकीत यवतमाळ नगर पालिकेच्या कंत्राटानुसार शहरातील सर्व कचरा साफ होण्यासाठी पालिकेने योग्य नियोजन करावे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंत्राटदारामार्फत करण्यात येत असलेल्या कामांचे रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे. कंत्राटदारांचे प्रतिनिधी तसेच त्यांच्याकडील कार्यरत स्टाफच्या नियमित बैठका घ्याव्यात. पालिकेने कंत्राटदाराच्या निविदा प्रक्रियेत स्पष्टता ठेवावी. तसेच सध्या कार्यरत कंत्राटदाराने नवीन प्रक्रिया होईपर्यंत काम थांबवू नये. पुढील महिन्यात ही मुदत संपुष्टात येत असली तरी पूर्ण मुदतीपर्यंत काम करावे. पालिकेच्या मालकीच्या असलेल्या घंटागाड्या सुस्थितीत ठेवाव्यात. तसेच शहराच्या कोणत्याही प्रभागातून कचऱ्याची तक्रार येणार नाही, याबाबत काळजी घ्यावी स्पष्ट असे निर्देश दिले.
हेही वाचा - 'ग्रामीण भागातील सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदी उठवा', लोककलांवतांवर उपासमारीची वेळ