यवतमाळ - मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या उमरखेड तालुक्यात ३ दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ढानकी ते खरुस हा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आता वाहतुक व्यवस्था सुरुळीत झाली.
काल (शुक्रवार) रात्री झालेल्या या पावसामुळे ढानकी ते खरुस हा रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला असून लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज (शनिवार) दुपारपर्यंत या दोन गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर पुलावरील पाणी ओसरल्याने वाहतुक सुरुळीत झाली आहे. लोक आता रस्त्याने ये-जा करत आहेत. या भागात प्रशासनाने नादीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. उमरखेड तालुक्यात सकाळी ८ वाजेपर्यंत ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.