यवतमाळ - शहरातील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या इमारतीच्या लिफ्ट खाली एका महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कक्षापुढेच ही लिफ्ट असून या ठिकाणी सतत वर्दळ असते.
असे असतानाही याबाबत सर्वच अनभिज्ञ होते. साडी परिधान केलेल्या या महिलेचा मृतदेह पूर्णतः कुजलेला असल्याने ओळख पटू शकली नाही. मृतदेहाची अवस्था पाहता साधारणतः ४ ते ५ दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा - ४० वर्षीय नराधमाचा दोन चिमुकलींवर बलात्कार; एक सख्खी नात, तर दुसरी शेजारी
मंगळवारी दुपारच्या सुमारास अधिष्ठातांचा कक्ष असलेल्या परिसरात तीव्र दुर्गंध येत होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी येथील लिफ्टचे दार उघडून बघितले असता लिफ्टच्या खाली महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.
रुग्णालयातील ही लिफ्ट गेल्या ३ महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने कुणीही लिफ्टचे दार उघडले नाही. लिफ्टचे केबिन हे तिसऱ्या माळ्यावर अडकले होते. त्यामुळे दुसऱ्या किंवा पहिल्या माळ्यावरील लिफ्टचे दार उघडल्याने ही महीला खाली पडून दगावली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महिलेचा घातपात तर झाला नाही ना? या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा - 'भाजपच्या हिडीस आणि आक्रस्ताळेपणाला आपनं शांततेत सडेतोड उत्तर दिलं'
जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची नेहमीच वर्दळ असते. मृत महिला त्यापैकीच एक असण्याची शक्यता आहे. या घटनेबाबत रुग्णालयात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेलादेखील काही कळले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तुर्तास रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.