यवतमाळ - घाम गाळून पिकविलेला कापूस वेचणीला आला आहे. कृषी प्रथा आणि परंपरेनुसार सितादही पूजन करून कापूस वेचणीला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. त्यासाठी शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. सध्या शेतशिवारांमध्ये कापूस निघाला असून तो वेचण्याची तयारी सुरू झाली आहे. ही वेचणी सुरू करण्यापूर्वी जो काही विधी केला जातो, त्यालाच सीतादही असे ग्रामीण भागात संबोधले जाते. ही विधिवत पूजा करून शेतकऱ्यांनी कापूस वेचणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
सीतादहीकरिता वेचणीच्या पहिल्या दिवशी गाईच्या दुधाचे विरजण लावून दही तयार केले जाते. भात शिजवून पूजेची सामुग्री फुले, हळद कुंकू तयार ठेवून दाम्पत्याकडून पूजेची आरास केली जाते. 7 दगड धुवून कपाशीच्या झाडाजवळ मांडून कापूस फुलाच्या प्रतिमा तयार केल्या जातात. नंतर नवीन कापसाचा पाळणा केला जातो. पूजा संपताच नारळ फोडून साखर मिश्रीत दहीभाताचे बोने शेतात फेकण्यात येते. पहिले दिवाळीनंतर कापूस वेचणीला सुरुवात होत होती. मात्र मागील काही वर्षांपासून बिजी बियाणे आल्याने दसऱ्यापूर्वीच कापूस निघणे सुरू झाले आहे. यावर्षी पांढऱ्या सोन्याची खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना आपल्या लावगड खर्च सुद्धा काढता येणार नाही, अशी बिकट अवस्था या वर्षीच्या खरीप हंगामात आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये, जितका निघेल तितका कापूस वेचणी करून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.