यवतमाळ - कोविड लसीकरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्ह्यात 16 जानेवारीपासून करण्यात येत असून जिल्ह्यातील सहा केंद्रावर प्रत्यक्ष लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. ही लस अकोला येथून पोलीस संरक्षणामध्ये जिल्ह्यात आणण्यात येणार आहे.
600 लाभार्थ्यांना देणार लस
जिल्ह्यातील दारव्हा, पांढरकवडा, पुसद येथील उपजिल्हा रुग्णालय, वणी आणि उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालय आणि सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण करण्यात येईल. एका ठिकाणी 100 लाभार्थी याप्रमाणे 600 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक लिमिटेडची ‘को-व्हॅक्सीन’ या लसींचा पुरवठा येत्या दोन दिवसात होणार आहे. जिल्ह्यात एकूण 83 कोल्डचेनअंतर्गत 108 रेफ्रिजरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15, 253 हेल्थ वर्कर्स लाभार्थ्यांचा डाटा संकलित करण्यात आला असून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत 3396, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत 7064 आणि खासगी रुग्णालयाच्या 4793 लाभार्थ्यांचा समावेश आहे.