यवतमाळ - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढत असून, कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. यात सातत्य राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मात्र अजूनही काही नागरीक विनाकारण फिरत असून, गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरातील गर्दी कमी करण्यासाठी तसेच निर्बंधांचे पालन योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची तपासणी करण्याकरता जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला.
वरीष्ठ अधिका-यांसह संपूर्ण यंत्रणेनेच यवतमाळ शहरातील रस्त्यावर फिरून, कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे सर्व सुरू आहे का? एखाद्या दुकानासमोर गर्दी तर होत नाहीना, तसेच नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत आहे की नाही याचा आढावा घेण्यात आला.
कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
किराणा दुकानदारांनी ग्राहकांचे व्हॉट्सॲप, मोबाईल क्रमांक घेऊन घरपोच डिलीव्हरी देण्याचे नियोजन करावे. जेणकरून दुकानात गर्दी होणार नाही. तसेच अनेक नागरिक दुचाकीवरून विनाकारण फीरत आहेत, त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी. नागरीक विनाकारण फिरत राहिले तर येणा-या तिसऱ्या लाटेसाठी आपणच जबाबदार राहू. या लाटेमध्ये सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाचा वानखेडे स्टेडियमला तडाखा; स्टँडची अशी झाली अवस्था, पाहा फोटो