यवतमाळ - कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवसांसाठी संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, यवतमाळमध्ये संचारबंदीचे आदेश केवळ कागदापुरतेच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सकाळपासून अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दृश्य दिसत आहे. याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दित आहे.
दुकानांचे शटर बंद विक्री सुरू
यवतमाळ शहरातील व तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर बंद ठेवले आहेत. मात्र, दुकानाबाहेर ग्राहक आल्यानंतर आतून सामानाची विक्री बिनधास्तपणे सुरू आहे. यामुळे लागू असलेले निर्बंध झुगारून ग्राहक व व्यापारी ही मालाची खरेदी-विक्री करत असल्याने यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती दिसत आहे. जिल्हा व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केल्यास याला पायबंद बसू शकतो.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी
लागू करण्यात आलेली संचारबंदी ही एक मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत असून नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी करीत आहे. मात्र, जीवनावश्यक दुकानात शासनाने जी नियमावली दिली आहेत त्यानुसार सामाजिक अंतर, ग्राहकांचे सॅनिटाइज करणे, दुकानातील कर्मचाऱ्यांचे चाचणी करणे, असे कोणतेच नियम पाळले जात नाही. दुकानात एकाच वेळी आठ ते दहा ग्राहक येत असल्याने मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची वाढ होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - यवतमाळमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली; रुग्णांना बेड मिळेना