यवतमाळ - राज्यात कोरोनामुळे विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात सोमवारी 23 मार्चला सकाळी 5 वाजतापासून ते 31 मार्च मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचाययती क्षेत्रात ही संचारबंदी राहणार आहे. या अंतर्गत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे बाजारपेठ, बसेस बंद आहेत.
मागील दोन दिवसांत जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 38 नागरिकांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहे. बाहेरगाववरून आलेल्या नागरिकांसह स्थानिकांनी घरीच रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी शहरातील दर्डा नगर, आर्णीरोड, लोहारा, दाते कॉलेज रोड, बसस्थानक, वाघापूर, जय विजय चौक, कळंब चौक अशा विविध भागात पेट्रोलिंग केली.
हेही वाचा - #CORONAVIRUS : इटलीतील स्थिती सांगतोय मराठी तरुण...याची देही, याची डोळा
नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय एकत्र येण्यास मनाई राहील. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सदर आदेश लागू नसले तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात कुठेही नागरिकांनी अजिबात गर्दी करू नये. नागरिकांनी घरात रहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.