यवतमाळ - मुख्यमंत्री व्यवस्थित निर्णय घेत आहेत, कोरोनाची परिस्थिती अतिशय सयंमाने हाताळत आहेत, हळूहळू मुंबईतील लोकल सेवा पूर्वपदावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. लस आली असली तरीदेखील कोरोना अद्यापही पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण मुख्यमंत्र्यांवर अकालतांडव करण्याची गरज नाही, त्यांना साथ द्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. वणी येथे राष्ट्रवादी परिवार सवांद यात्रा कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कर्नाटकचा मुंबईवर अधिकार नाही
सध्या कर्नाटक, महाराष्ट्र सीमा प्रश्नावरून चांगलेच राजकारण तापले आहे. कर्नाटकतील सीमाभाग कुणाचा यावर रणकंदण सुरू आहे. कर्नाटकचा मुंबईवर अधिकार नाही. मुंबई-कर्नाटक मुद्यावर विनोद सुरू आहे. कर्नाटकने मुंबई आपली म्हणणं आणि आपण बंगळुरू आपले म्हणणे हा विनोद आहे. कर्नाटकाचा मुंबईवर अधिकार नाही. असंही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधता यावा, त्यांच्या समस्या समजून घेता याव्यात, यासाठी या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.