यवतमाळ : दरवर्षी जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी उत्सवावर कोरोनाचे संकट आहे. 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:ची, कुटुंबाची व इतर नागरिकांची काळजी घेत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
'गतवर्षी जिल्ह्यात 1 हजार 700 सार्वजनिक मंडळे होती. यावर्षी यापैकी जवळपास 500 सार्वजनिक मंडळानी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्धार केला असून घरीच बाप्पाची मूर्ती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. इतरही सार्वजनिक मंडळांनी असा आदर्श निर्माण करून अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करावा. गणेशाची मूर्ती स्थापन करताना घरी दोन फूट तर सार्वजनिक ठिकाणी चार फुटापर्यंतच मूर्ती असावी. जेणेकरून लोक एकमेकांच्या संपर्कात येणार नाही व गर्दी होणार नाही. गणपतीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
'जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सार्वजनिक मंडळात गणेशमूर्ती स्थापन करणे टाळावे. यावर्षी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला नाही, तर पुढील वर्षी मंडळाला परवानगी मिळणार नाही, या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये. पुढील वर्षी मंडळांना रितसर परवानगी नक्की मिळेल. ज्या सार्वजनिक मंडळांना मूर्तीची स्थापना करावयाची आहे, त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दुकानात, शेडमध्ये, हॉलमध्ये गणेशाची मूर्ती बसवावी. जेणकरून रस्त्यावर गर्दी होणार नाही. विसर्जनाच्या दिवशी जागेवरच आरती करावी. पालिकेतर्फे विसर्जनासाठी आपली मूर्ती घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम. राज कुमार म्हणाले.