यवतमाळ - रेती घाटावरून अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्यांविरुध्द जिल्हा प्रशासनाच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. २९ एप्रिलच्या रात्री महसूल विभागाने केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान २ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महसूल विभागाने विशेष मोहिमेदरम्यान अवैध रेती वाहतुकीची एकूण १२ प्रकरणे शोधून काढली. यात दिग्रस तालुक्यात दोन प्रकरणे, पुसद तालुक्यात २, उमरखेड तालुक्यात ३, महागाव तालुक्यात १, घाटंजी तालुक्यात ३ आणि वणी तालुक्यातील १ प्रकरणाचा समावेश आहे. त्यापैकी पुसद येथील एका प्रकरणात २ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. तर दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील सात प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
उमरखेडमध्ये एकाच नंबरच्या दोन ट्रक मधून रेती तस्करी
उमरखेड तालुक्यातील जुनीतीवडी या रेती घाटावरून एकच क्रमांक असलेल्या दोन टिप्परमधून रेतीची तस्करी केल्या जात होती. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कारवाई केली. तालुक्यातील पळशी, बोरी, तिवाडी, चिंचोली, खरुस, दीघडी, सवलेश्वर हे मोठे रेती घाट आहे. या घाटापासून शासनाला कोट्यवधीचा महसूल मिळतो. जुनी तिवडी या रेती घाटावरून तस्करी होत असल्याची माहिती महसूल आणि पोलीस विभागाला मिळाली. त्यावरून या विभागाने कारवाईचा बडगा उगारला. तेव्हा एकच क्रमांकाच्या दोन टिप्परमधून रेतीची वाहतूक केल्या जात होती. शिवाय एकाच रॉयल्टी पासवर हे दोन्ही टिप्पर दिवस भर रेतीची वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी कारवाई केली.