यवतमाळ - वणी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांसोबत कर्तव्यावर असलेल्या होमगार्डने ट्रिपल सीट असलेल्या दुचाकीस्वाराला दंड का मागितला, असा जाब आमदार बोदकुरवार यांनी विचारला. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने होमगार्डने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी. यासाठी जिल्हा वाहतूक विभागाची उपशाखा सुरू करण्यात आली आहे. या विभागात पोलीस कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या मदतीसाठी 20 होमगार्ड देण्यात आले आहेत. होमगार्ड प्रकाश बोढे हे टीळक चौकात वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत करत होते. त्यावेळी दुचाकीवरून (एम एच 29 ए क्यू 7853) ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकाला थांबवले व दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यातील एका युवकाने याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना माहिती दिली.
आमदार बोदकुरवार हे आपल्या वाहनाने टिळक चौकात आले कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड खाकी पॅन्टवर पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून असल्याने आमदारांनी त्याला गणवेशात का नाही प्रश्न केला व कानशिलात लगावली, अशी चर्चा आहे. होमगार्डने वाहतूक विभाग गाठले व घडलेली हकीकत सांगितली. मात्र, काही वेळाने मला मारले नसल्याचा पवित्रा होमगार्डने घेतला व शासकीय काम करत असताना आमदार बोदकुरवार यांनी माझ्या कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार वणी पोलिसात दिली. त्या तक्रारीवरून आमदार बोदकुरवार यांच्या विरोधात पोलिसांनी कलम 186 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडी अपवित्र, जास्त दिवस टिकणार नाही - हंसराज अहीर