यवतमाळ - जनावरांच्या गोठ्याच्या जागेचा वाद विकोपाला जाऊन मोठ्या भावाने लहान भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याने खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना झरी तालुक्यातील पालगाव (बोटोनी) येथे घडली. अशोक सीताराम आत्राम (43) असे मृतकाचे नाव असून वसंता सीताराम आत्राम (49) असे भावाची हत्या करणाऱ्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी वसंता आत्राम हा जनावरांच्या सामूहिक गोट्यात झांज्या बांधत असताना मृत अशोक आत्राम हा गेला होता. यावेळी थोडी जागा सोडून झांज्या बांध असे म्हणताच गोठ्याच्या जागेवरुन भावांचा वाद विकोपाला गेला. यावेळी आरोपी वसंता आत्राम याने भावाला कुऱ्हाडीने मानेवर वार करताच तो खाली पडला. रक्ताचा सडा पडलेल्या जागी माती टाकून घटना स्थळावरून वसंता फरार झाला. मृतकाची पत्नी पुष्पा आत्राम आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी पांढरकवडा येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच अशोकचा मृत्य झाला. मृतकाची पत्नी पुष्पा आत्राम यांच्या तक्रारीवरुन आरोपी वसंता आत्राम वर गुन्हा दाखल करून मारेगाव पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सुशील कुमार नायक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार,उपनिरीक्षक अमोल चौधरी करत आहेत.