यवतमाळ - बीड येथील तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. तिच्या आत्महत्यामागे असलेल्या कथित मंत्र्याचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करावी, पूजा चव्हाणला न्याय द्यावा या मागणीसाठी भाजपाच्यावतीने एलआयसी चौकामध्ये निर्देशने देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
'ऑडिओ क्लिपची चौकशी का नाही?'
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक व मुख्यमंत्र्यांना पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये ज्या 12 ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांत व्हायरल झाल्या त्या देण्यात आल्या. मात्र, अद्यापही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे भाजपाकडून पहिला टप्पा म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
'यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार'
दोषींवर कारवाई झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. अत्याचारासाठी हे सरकार आहे का? महाविकास आघाडी सत्तेत आले, तेव्हापासून सतत महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र याची कुठलीच दखल घेण्यात येत नाही. बीड, अमरावती येथील असे अनेक प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे सरकार महिला अत्याचारासाठी सत्तेत आहे का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.