यवतमाळ - जिल्ह्यासह परजिल्ह्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून साडेतीन लाखाच्या 11 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पवन उर्फ पुण्यवान महादेव डाखोरे (वय - 22 रा. दादा बादशहानगर ता. राळेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
यवतमाळ शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, राळेगाव येथील दुचाकी चोरटा हा रात्रीच्या सुमारास शहरातील महादेव मंदिर परिसर चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने आला आहे. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याने 11 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी आरोपीने धामणगाव ते कळंब बायपासवर चार दुचाकी लपवल्या होत्या. त्याचबरोबर कळंब ते राळेगाव मार्गावर 4 दुचाकी लपवल्या होत्या. आरोपीकडून शहर पोलिसांनी ऐकून 11 दुचाकी किंमत जवळपास 3 लाख 50 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहर ठाणेदार धनजय सायरे, रवी आडे, अमित जाधव, संतोष व्यास, कलमेश भोयर यांनी पार पडली. पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण बाकडे करीत आहे.