यवतमाळ - मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या मुलीला औषध देण्यात आले. मात्र, या औषधांमध्ये मृत मुंग्या आणि दुर्गंध येत असल्याने या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या रुग्णालयात असलेल्या सर्व औषधांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मारेगाव शहरातील कृष्णा तुरणकार यांची 4 वर्षाची मुलगी गुंजन हिला ताप आल्याने शहरातील ग्रामीण रुग्णालयात दुपारच्या सुमारास उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करुन तिला सिट्रीज-पी सायरप ही औषधची बाटली दिली. त्यानंतर गुंजनच्या वडिलांनी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास औषध देण्याकरिता सील पॅक औषधाची बाटली फोडून त्याच्या झाकनामध्ये औषध टाकले. मात्र, त्यात मृत मुंग्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तसेच औषधांचा सडका वास येवून त्यात मृत मुंग्या आढळल्या.
दरम्यान, तुरणकार यांनी शेजारच्या नागरिकांना सोबत घेवून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांनी तात्काळ या औषधचे वाटप बंद करायला लावून सदर औषध तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यास सांगितले. सिट्रीज-पी सायरप हे औषध 7 वर्षापर्यंत बालकास सर्दी-खोकला झाल्यास उपचारासाठी देण्यात येते. मात्र, सरकारी दवाखान्यातील औषध खराब निघाल्याने त्या सील पॅक औषधाचा सडका वास येवून त्यात मृत मुंग्या आल्या कश्या, जर ती औषध त्या ४ वर्षाच्या चिमुकलीला तिच्या वडिलांनी पाजले असता तिच्या जिवितास कमी जास्त झाल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रुग्णालयात असलेल्या सर्व औषधांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालकडून करण्यात येत आहे.