यवतमाळ - प्रगतीशील शेतकरी म्हणून परिचित असणार्या आर्णी तालुक्यातील तेडोळी येथील परसराम मनीराम राठोड यांनी सात एकर शेतात भुईमुगाची लागवड केली होती. पण साडेतीन महिन्याच्या मेहनत करूनही पिकावर रोगराई आल्याने पीक पिवळे पडले. त्यामुळे त्यांनी संतप्त होऊन पिकात जनावरे सोडली.
शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान
शेतात नांगरणी, वखरणी, बिजवाई, पेरणी, रासायनिक खते, कीटनाशक फवारणी, डवरणी, निंदणे आणि पाणी असा एकूण अंदाजे दीड लाख रुपयांचा खर्च भुईमुगावर झाला. पण साडेतीन महिन्यात पिकावर रोगराई आल्याने शेतातील पीक पिवळे पडले. तसेच भुईमुगाला एकही शेंग लागली नाही. त्यामुळे सात एकरातील जवळपास तीन ते साडे तीन लाखाचे मोठे नुकसान त्यांचे झाले. त्यामुळे संतप्त परसराम राठोड यांनी सात एकरातील भुईमुगाच्या पिकांत चक्क बकर्यांसह जनावरे चारणी करिता सोडली. जानेवारीत लागवड केलेले हे पीक पंधरा दिवसात निघणार होते. परंतु साडेतीन महिने मेहनत घेवून एकही शेंग लागली नसल्याने शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ही परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे. आधीच लांबलेल्या आणि अवकाळी पावसाने खरीप आणि रब्बी पीक हातातून गेली. तर उन्हाळी पिकांचेदेखील मातेरे झाले आहे.