यवतमाळ - ऐरवी शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेल्यानंतर अडत्यांना दलाली, माल वाहतूक करणाऱयांना हमाली द्यावी लागते. मात्र, आज पोस्टल ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी शेतात उत्पादित केलेल्या मालाची विक्री केली.
जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात मेहनत करून शेतमाल पिकवितो. मात्र, तो बाजारात विक्रिकरीता आणल्यानंतर दलालमार्फत विक्री करतो. यामध्ये विनाकारण शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला समोर जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना शेतमाल विक्री केल्यास त्यांना नफा मिळू शकतो. हीच कल्पना डोळ्यासमोर ठेवून या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसाठी थेट माल विक्रीचे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्ह्याभरातून जवळपास शंभरावर शेतकरी या ठिकाणी आपले धान्य, भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. यामधून ग्राहकांना शेतातील उच्च दर्जाचा माल मिळत आहे, तर शेतकऱ्यांनाही या महोत्सवात धान्याची विक्री व बुकिंग करून थेट घरपोच गहू, चना डाळ देण्याची हमी देत आहे. त्यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळत असून शेतकऱ्यांना नफा मिळत आहे.