यवतमाळ - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशीर्वाद' यात्रेचे नेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आगमन झाले. यावेळी आदित्य ठाकरे बैलगाडीवरून या ठिकाणी आले. त्यांनी तूर व सोयाबीन या शेतमालाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी उत्पादन खर्च व मिळणारा भाव जाणून घेत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना थांबणार नाही, असे त्यांनी शेतकऱ्यांना वचन दिले. मात्र, शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ झाला नाही, ज्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे, त्यांच्यासाठी शिवसेना लढा उभारेल, असे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर सरसकट कर्जमुक्तीसाठी आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढत आहोत. शिवसेनेचे आमदार, खासदार, शिवसैनिक प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवाज उठवत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना दिली.