यवतमाळ- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा विधेयक व नॅशनल सिटीझनशिप रजिस्टरला विरोध करण्यासाठी 28 डिसेंबरला मुंबईत विरोध रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. या विरोध रॅलीमध्ये राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहे, अशी माहिती काँग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळात दिली आहे.
संपूर्ण देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध होत असून देशात याबाबत असंतोष आहे. देशात सर्वांना एकत्रितपणे व समान पद्धतीने न्याय मिळावा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात तसेच घटनेच्या प्रस्तावनेत दिलेले आहे. प्रत्येक सरकारने घटणेशी बांधिलकी ठेवलीच पाहिजे. मात्र, वर्तमान केंद्रशासन याला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे.
भाजप व मोदी सरकारने या विधेयकाला मागे न घेता विधेयकाचा विरोध करणाऱ्या लोकांचा विरोध करायला सुरुवात केली आहे. भाजपने जनतेच्या भावना लक्षात न घेता कॅबच्या समर्थनासाठी अनेक संघटनांना एकत्रित केले आहे. याचा काँग्रेस नेते म्हणून ठाकरे यांनी निषेध केला आहे. त्याचबरोबर, येत्या 30 डिसेंबरला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेस 10 मंत्रिपदांपैकी 1 जागा रिक्त ठेवणार आहे. किंवा मागे ठेवणार आहे, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला एकूण 12 जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी दोन मंत्रिपदाच्या जागा आधीच काँग्रेस पक्षानी भरल्या आहेत. उरलेल्या दहापैकी एक जागा भरली जाणार नाही, असेही माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- पांढरकवडा जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत एकही शिक्षक नाही, अवघ्या १ महिन्यावर बारावीची परीक्षा