यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत पाटापागंरा नळयोजनेचे कर्मचारी दुलसिंग धर्मा राठोड यांचा विद्युत स्पर्श होऊन मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. १०) घडली आहे. ग्रामपंचायत गेल्या दोन वर्षांपासून वीज चोरी करत असताना विद्युत वितरण कंपनीने त्यावर कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रोजंदारीने काम करणारे दुलसिंह राठोड हे नळ योजनेचे पाणी सोडण्यासाठी डीपीजवळ गेले. तेथे त्यांनी डीपी बाजूलाच असणाऱ्या विद्युत तारेवरून विद्युत चोरून वीजप्रवाह चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे डीपीमध्ये विद्युत प्रवाह संचारला होता. त्यामुळे, जेव्हा दुलसिंह यांनी डीपीमधील विद्युत मीटरला सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यादरम्यान विद्युत स्पर्श झाल्याने ते फेकले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या दोन वर्षांपासून वीज चोरून पाणी पुरवठा करण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत वारंवार ग्राम पंचांयतीला सूचना देऊन सुध्दा हा जीवघेणा प्रकार सुरूच होता. काल अश्याच घटनेत दुलसिंह यांचा करुण अंत झाला. या घटनेनंतर दोन वर्षांपासून वीज चोरी होत असताना त्यावर विद्युत कंपनीने कारवाई का केली नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पारवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चौधरी करीत आहे.
हेही वाचा- इथं बासरी अन् ढोलकीच्या तालावर गायी बसतात घोंगडीवर