यवतमाळ- बंदी असलेले कापसाच्या बीटी बियाण्याची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. कळंब तालुक्यातील झाडकिन्ही या गावात 3 लोकांच्या घरी कृषी विभागाने धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत 419 बोगस बीटी बियाण्यांचे पाकीट जप्त करण्यात आले. कारवाईत 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात येते. फवारणीचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने शेतकरी बंदी असलेल्या बीटी 3 कापसाच्या वाणाची लागवड करताना दिसत आहे. हे वाण चोरीच्या मार्गाने जिल्ह्यात विकल्या जात आहे. कळंब तालुक्यातील झाडकिन्ही या गावात अशाच प्रकारच्या बोगस बीटी बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली हाती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान गावातील विक्रम कोंडे, देवेंद्र डुकरे व देविदास परचाके यांच्या घरी छापा टाकला असता 419 पॅकेट अनधिकृत कापूस बियाणे आढळून आले असून हे जप्त करण्यात आले आहेत. यात विजय, जेके 777, सिकंदर, राघवा, आर 659 या बोगस बीटी वाणाचा समावेश आहे.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केली तर बोगस बियाणे विक्री करणारे मोठे रॅकेट पोलिसांच्या गळाला लागू शकते. ही कारवाई जिल्हा कृषी विकास अधिकारी पंकज बरडे व इतर कृषी व पोलीस अधिकारी यांनी केली.