यवतमाळ - गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही जिल्ह्यात 4 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यात 3 युवक आणि एका युवतीचा समावेश आहे. तर पॉझिटिव्ह असलेले 5 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना विलगीकरण वॉर्डातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले चारपैकी 3 युवक (वय 28 वर्षे, 33 वर्षे आणि 36 वर्षे) हे महागाव येथील मृत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील आहे. तर एक 15 वर्षीय युवती ही नागापूर, ता. उमरखेड येथील मृत पॉझिटिव्ह महिलेच्या निकटच्या संपर्कातील आहे. त्यामुळे जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 46वर पोहोचली होती. मात्र, विलगीकरण वॉर्डात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह असलेले 5 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 वर आली आहे.
दरम्यान, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण वॉर्डात एकूण 50 जण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 154 आहे. यापैकी 41 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह भरती असून 111 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.