यवतमाळ - मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा नेर तालुक्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तालुक्यातील मंगलादेवी, गौळण, माणिकवाड, पिंपरी मुक्तापूर, अजंती शिरजगाव, वटफळी, मालखेड या गावातील दोनशे एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
काल रात्री नेर तालुक्यात 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तालुक्यातील मंगलादेवी लगत असलेल्या मिलमिली नदीला पूर आला. नदीलगत असलेल्या दोनशे एकर शेतीमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. पुराचा प्रवाह एवढा प्रचंड होता की, गेल्या 50 वर्षात अशा प्रकारच्या पूर बघितला नाही, असे अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांनी सांगितले.
आधीच दुबार पेरणी, बोगस बियाणे या सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी आता अस्मानी संकटामुळे पूर्णत: खचला आहे. नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या आठवड्यापासून मध्यम ते मुसळधार स्वरूपचा पाऊस पडत आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. या पावसामुळे निळोणा धरण भरले असून यवतमाळकरांना येत्या उन्हाळ्यासाठी दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील इतर लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे.