वाशिम - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ-वाशिम मतदार संघात आज मतदान होणार आहे. ६१७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात एकूण २४ उमेदवार रिंगणात असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर २ बॅलेट युनिटचा वापर करण्यात येत आहे. याची मतदारांना माहिती मिळण्यासाठी मतदान केंद्राच्या दर्शनी भागात बॅलेट युनिटचा डेमो लावण्यात आला आहे.
मतदान पथकामध्ये २१२० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ६ लाख ४३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात तापमान ४० डिग्रीच्यावर जात असल्यामूळे सकाळच्या सत्रात किती मतदान होते, यावर मतदानाची टक्केवारी अवलंबून असणार आहे.