वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले मजूर महानगरासह इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. तर काम बंद झाल्याने हे सर्व मजूर पायीच आपल्या गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. असेच हिंगोली जिल्ह्यातील बस्मत येथून एक महिला पाठीवर आपल्या बाळाला घेऊन वाशिम जिल्ह्यातील गांगलवाडी येथे 150 किलोमीटरचे अंतर पायी पार करत परत आली आहे.
परत येत असताना या महिलेने रखरखत्या उन्हात पाठीवर झोळी बांधत त्यात बाळ ठेवून रखरखत्या उन्हात 5 दिवस पायी प्रवास केला आहे. आई होणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. मात्र, एका आईला बाळाचे संगोपन करत लहानाचे मोठे करणे किती अवघड आहे. हे या माऊलीच्या परिश्रमातून दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बस्मत येथे हे परिवार हळदीच्या कामासाठी गेले होते. अनेक दिवसांपासून हाताचे काम बंद झल्याने परत गावाकडे जाण्यासाठी रेल्वेमार्गाने 5 दिवस 150 किलोमीटर प्रवास करत हे कुटुंब वाशिममध्ये पोहोचले आहे. तर सध्या वाशिम जिल्ह्यात 40 अंशच्या वर तापमान असल्याने हा प्रवास हृदयद्रावक असल्याचे पाहायला मिळाले.