वाशिम- समृद्धी महामार्गासाठी संपादित होत असलेल्या जमिनीची नियमानुसार खरेदी व्हावी, अशी मागणी वाशिममधील शेतकऱयांनी केली आहे. त्यासाठी चोरद येथील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जातो. या महामार्गासाठी संपादित होत असलेल्या जमिनीचे क्षेत्र विवरणपत्रानुसार चुकीचे दाखवले जात आहे. यात दुरुस्ती करण्यात यावी. तसेच, संपादित होत असलेल्या जमिनीचे खरेदीखत घेऊन त्याचा शासकीय नियमानुसार मोबदला दिला जावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
हा मोबदला मिळेपर्यंत समृद्धी महामार्गाचे कुठल्याही प्रकारचे खोदकाम वा बांधकाम स्थगित करण्यात यावे. अशी मागणी शेतकऱयांकडून करण्यात आली आहे. यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील चोरद येथील शेतकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे यावेळी उपोषणकर्त्या महिलांनी सांगितले.