वाशिम- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाशिम पोलीस विभागाच्यावतीने भावनिक आवाहन करून जनतेला 'घरीच रहा, आम्ही वाशिम पोलीस आहोत आणि तुम्हीसुद्धा आमचे कुटुंब आहात, असे भावनिक आवाहन कर्मचाऱ्यांच्या हाती फलक देऊन करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग पहाता आपल्या कर्मचाऱ्यांच्या हाती विविध वाक्य लिहिलेले भावनिक फलक दिले आहेत. या फलकांच्या माध्यमातून रस्त्याने जात असलेल्या नागरिकांना कोरोना विषाणूबाबत सजग करून त्यांची जनजागृती केली जात आहे. फलकांवर मला ३ वर्षाची मुलगी आहे, माझी आई आजारी आहे, माझी पत्नी माझी चिंता करते, पण आम्ही घरी जाऊ शकत नाही, आम्हाला घरी सुरक्षित जाण्यासाठी मदत करा, आम्ही तुमचे रक्षण करू, आम्ही आपणास सुरक्षित ठेवू, कृपया आम्हाला सहकार्य करा, कृपया घरी थांबा, असे भावनिक आवाहन पोलिसांकडून केल्या जात आहे.
आवाहन करताना इतर देशांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या व झालेल्या मृत्यूचा आकडासुद्धा दाखविण्यात येत आहे. नागरिकांनी घरातच रहावे व आम्हाला कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी मदत करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या भावनिक आवाहनामुळे वाशिमकरांच्या सुरक्षेबाबत पोलिसांमध्ये असेलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येत आहे.
हेही वाचा- लॉकडाऊन : वाशिमध्ये पोलीस ‘अॅक्शन मोडवर’, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना काठ्यांचा 'प्रसाद'